पुणे : तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे २४ तास तुम्हाला माहिती असतं.. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून सातत्याने टीका होत असते. त्याच टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर देतानाच सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला हाणला. बारामतीमधील पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या.
मी कुठे आहे हे २४ तास तुम्हाला माहीत असतं. माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठंय ते.. सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करतीय?.. कारण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या. आपला कारभार पारदर्शक आहे, असे सांगतानाच अप्रत्यक्षरीत्या त्यांनी विरोधकांना टोलाच लगावला.
हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है. आमचे विरोधकही म्हणतात, की आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत. पण हे दुर्दैव आहे की इतकं दूषित राजकारण आज झालंय, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून टीका होत असते.. त्यावर सुळे यांनी भोरमधील महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बोलताना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.
रोजगार मेळाव्यावर केली टीका
यावेळी सुप्रिया सुळे यांनी रोजगार मेळाव्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणूक आली की हे मोठे मोठे मेळावे घेतात आणि याला खर्च केंद्र सरकार करतं. या सगळ्यामधून जाहिरात कुणाची होत आहे? तर यांच्या महायुतीची. यामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा सातत्याने यांची जाहिरात करण्यासाठी होत आहे. हे मोठे दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.