मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने २०१९ साली लोकसभा निवडणुकीत धनुष्य-बाण चिन्हावर २२ जागा लढविल्या होत्या. आतादेखील आम्ही २२ जागा मिळाव्यात म्हणूनच आग्रही असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून याबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आधी स्वत:च्या पक्षाची काळजी करावी. उरलेले ५-६ आमदार आणि २-३ खासदार आहेत त्यांची काळजी करावी, असा टोलाही देसाई यांनी लगावला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, मागच्या वेळी म्हणजेच २०१९ साली शिवसेना २२ जागांवर लढली होती आणि त्यातील १८ जागा जिंकल्या होत्या त्यामुळे या वेळीसुद्धा आम्ही २२ जागांसाठी आग्रही आहोत. लवकरच या बाबतीत अंतिम निर्णय तिन्ही पक्षांतील प्रमुख नेते मिळून घेतील. आमच्या महायुतीत चांगले वातावरण आहे आणि कोणीही नाराज नाही. एखाद्या पक्षाने किंवा नेत्याने एखादी जागा मागणे किंवा त्यासाठी आग्रह करणे म्हणजे नाराजी नव्हे ती त्यांची मागणी आहे. त्यावर बैठकीत चर्चा होऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. कोणीही नाराज होणार नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणजेच शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत हे नक्की झालेले आहे. कोणता पक्ष किती जागा आणि कोणत्या जागा लढवणार आहे, हे लवकरात लवकर अंतिम होईल. प्रत्येक पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठका झालेल्या आहेत त्यांनी अहवालही सादर केलेला आहे; परंतु अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील.