मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. याची आठवण करून देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे.
रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचा-यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत त्या ठिकाणी नियमित पदभरती करू नका, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करावी, कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या तसेच मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा या मागण्या वीज कर्मचा-यांच्या आहेत.
यासंदर्भात ट्वीट करत अंबादास दानवे यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे ऊर्जामंत्रीदेखील आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांच्याअंतर्गत आलेल्या कंत्राटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. नेहमीप्रमाणेच आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे आणि सरकारच्या घशाशी आले की, बळाच्या जोरावर आंदोलने मोडून काढणे, ही ठरलेली एसओपी या सरकारची आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज, मंगळवारी महाराष्ट्र दौ-यावर आहेत. जळगावपाठोपाठ अमित शाह यांची संध्याकाळी ६वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दुसरी सभा होणार आहे. याचा संदर्भ देत दानवे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. आज सरकारने आपले फॉर्म्युले बाजूला ठेवावेत. कर्मचा-यांशी चर्चा करा, अन्यथा संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळात वीज गेली तर, खांबावर चढण्याकरिता माणूस शोधावा लागायचा, असा टोला लगावला आहे.