कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर झालेला अत्याचार आणि हिंसाचार प्रकरणामध्ये आज कलकत्ता उच्च न्यायालयालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या प्रकरणी कठोर भूमिका घेताना हायकोर्टाने येथील एकूण तीन प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी शाहजहाँ शेख यालाही आज संध्याकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाचा हा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संदेशखालीमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली झालेले तीव्र आंदोलन आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर ५५ दिवसांपासून बेपत्ता असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहाँ शेख याला पोलिसांनी अटक केली होती. शाहजहाँ शेख याच्यावर लैंगिक शोषण आणि जमिनी हडप केल्याचे आरोप आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (दक्षिण बंगाल) सुप्रतिम सरकार यांनी सांगितले की, शेख याला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सुंदरवनाच्या बाहेरील परिसरात असलेल्या एका घरातून अटक करण्यात आली. हे ठिकाण संदेशखालीपासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. शेख हा इथे त्याच्या काही सहका-यांसोबत लपलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आल्यानंतर शेख याला कोर्टात हजर केले असता त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.