22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यएच.पी.व्ही. लसीकरणाने टळू शकतो गर्भाशयमुखाचा कर्करोग

एच.पी.व्ही. लसीकरणाने टळू शकतो गर्भाशयमुखाचा कर्करोग

परभणी : आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा व एक कानमंत्रही देते ‘स्वस्थ रहा, सुरक्षित रहा’. भगिनींनो गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांचा सायलेंट किलर व ही भारतातील एक सार्वजनिक आरोग्य समस्या देखील आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील दुस-या नंबरचा गंभीर कर्करोग आहे. भारतात दरवर्षी १,२२,८४४ महिला या कर्करोगाने संक्रमित होतात व त्यातील ७१,००० ते ७८,००० महिला दरवर्षी या कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात. स्तनाचा कर्करोग हा पण प्रथम क्रमांकावरील कर्करोग आहे. दोन्ही कर्करोगापासून प्रत्येक महिलेने जागरूक असायलाच हवे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आता या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पावले उचललेली आहेत व २०३० पर्यंत याच शतकात हा कर्करोग हद्दपार करण्याचे उद्दीष्ट योजिलेले आहे. भारतातही या वर्षी केंद्र सरकारने सुध्दा दमदार पावले उचलत १ फेब्रुवारी २०२४ च्या संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी एचपीव्ही लसीकरणाचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ही आम्हा सर्व महिलांसाठी खूप अभिनंदनीय बाब आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करणे व तो लवकरात लवकर लक्षात येण्यासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे यातील महत्वाचा टप्पा आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यापूर्वीच आपण सर्वांनी आपली व आपल्या मुलींची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे हे लक्षात घेतले पाहिजे व त्यासाठी आपणास खालील विषय विचारपूर्वक अभ्यासून वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग का होतो?
गर्भाशय मुखाचा कर्करोग एचपीव्ही या विषाणूमुळे होतो. हा विषाणू महिलेच्या शरीरात लैंगिक मार्गातून अतिक्रमण करतो व हा विषाणू १६ व १८ क्रमांकाचा आहे जो हा कर्करोग निर्माण करतो. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडेही संक्रमित होऊ शकतो. हा शरीरात संक्रमित झाला तर अनेक वर्ष शरीरात राहू शकतो व विशेष बाब म्हणजे शरीरात शिरला तरीही याची कोणतीही प्राथमिक लक्षणे नसतात. त्यामुळे आपल्या हातात एकच गोष्ट राहते ती म्हणजे या विषाणूंचा शरीरात प्रवेश रोखणेकिंवा आलाच तर त्याला मारणे. त्यासाठी आम्हास ९ ते १५ वयोगातील किशोरवयीन मुलींना या विषाणूची लस देणे अत्यावश्यक आहे.

एच.पी.व्ही.लसीकरण : एचपीव्हीचे लसीकरण आता भारतात उपलब्ध आहे. या लसीचे तीन डोस इंजेक्शनद्वारे घ्यावे लागतात. ०, १ महिना व ६ महीने असे तीन डोस या विषाणूला रोखण्यासाठी पुरेसे आहेत. तज्ञांच्या मते ही लस ९० टक्के परिणाम कारक आहे. ही लस ९ प्रकारच्या विषाणूंपासून आपणास संरक्षण देते हे विशेष उल्लेखनीय. यामध्ये गर्भाशयमुख, जननेंद्रिय, डोके, घसा, गुदद्वार या वरील कर्करोगावर हे प्रभावी ठरते. ही लस कमीत कमी १० वर्षे संरक्षण देते. ही लस म्हणूनच लैंगिक संक्रमण होण्याआधीच घेणे हा महत्वाचा टप्पा ठरतो. भारतातील ८० टक्के लोकांना वयाच्या २५ वर्षापर्यंत एचपीव्हीची लागण होऊन ते संक्रमित होतात. म्हणून १६ ते २५ वयोगातील महिलांना सुद्धा ही लस देता येते.

ज्या महिलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना गर्भाशय मुखाचा कर्करोग झपाट्याने वाढतो. म्हणून अशा महिलांनी सुध्दा या विषयी विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. महिलांमधील रोगप्रतिकार शक्ती क्षीण होण्याची कारणे म्हणजे धुम्रपान, मद्यपान, गर्भनिरोधक गोळ्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ घेणे, एड्स इतर काही आजार आहेत.

एचपीव्हीची काही लक्षणे : त्वचे वरील मस्से हे उंच, सपाटकिंवा फुलकोबीसारख्या आकाराचे असू शकतात, असे असल्यास त्वरीत लक्ष देणे गरजेचे ठरते.
गर्भाशय मुखाचा कर्करोग लक्षणे : हा कर्करोग एचपीव्ही विषाणूंमुळे होतो. सुरूवातीला या रोगाची फारच कमी लक्षणे असतात, म्हणून या कर्करोगाला महीलांचा सायलेंट किलर म्हणतात हा कर्करोग गर्भाशय मुखाच्या ज्या पेशी असतात तेथून सुरूवात होते. प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की अगदीच सुरूवातीच्या पायरीलाच हा रोग लक्षात यावयास हवा. ज्याला आपण सीआयएन म्हणतो म्हणजे प्री कॅन्सरस पायरी. कर्करोग होण्याआधीची पायरी. ह्या स्टेजला हा कर्करोग लक्षात आला तर रूग्ण १०० टक्के बरा होतो, हे लक्षात घ्या. हा कर्करोग त्वरीत लक्षात येण्यासाठी स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी व स्क्रीनींग करणे हा दुसरा महत्वाचा टप्पा आहे. त्यासाठी प्राथमिक तपासणी व पॅप स्मिअर टेस्ट करणे महत्वाचे आहे. परभणीतही ही तपासणी सर्व स्त्री रोग तज्ञांकडे उपलब्ध आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या कर्करोगाची वाढ झाल्यानंतरच लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे – पांढरा पदर जाणे, लैंगिक संभोगानंतर रक्तस्त्राव होणे, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे, योनीमागार्तून रक्ताने रंगलेला लालसर पिवळा स्त्राव जाणे, एक तीव्र गंधासह योनी मागार्तून स्त्राव येणे, रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होणे, ओटीपोटात दुखणे, पायांना सूज येणे ही लक्षणे कर्करोगाच्या वाढीनूसार असतात.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान : या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत. या सर्व तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करणे महत्वाचे ठरते, कारण यातील काही चाचण्या कर्करोगाची पायरी कोणती हे ठरविण्यासाठीही असतात. प्रारंभिक चाचणी ही अत्यंत महत्वाची चाचणी ठरते. ती म्हणजे १) पॅपस्मिअर टेस्ट. ही तपासणी या कर्करोगासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणात स्क्रींिनग होते तेव्हा करण्याची चाचणी आहे व ती अत्यंत प्रभावी चाचणी आहे. २) एचपीव्ही टायंिपग ३) कॉल्पोस्कोपी ४) बायोप्सी ५) सीटी स्कॅन ६) एमआरआय ७) ट्युमर मार्कींग इत्यादी. यासाठी सर्व महिलांचे लक्ष प्रथम पायरीची सुरूवात होण्या अगोदरच २५ वयातच पॅपस्मिअर तपासणी करून घेणे (नंतरही ही तपासणी करतात येते). कर्करोग होण्याआधी प्रतिबंध बरा हे आमचे घोषवाक्य असले पाहिजे.
आज जागतिक महिला दिन निमित्ताने सर्व महिलांनी पुढील गोष्टीकडे लक्ष देण्याचे महत्वाचे काम करावे.
१) सर्व किशोरवयीन मुलींना (९ ते १५ वयोगट) एचपीव्ही लसीचे तीन डोस लसीकरण करून घ्यावे. (०, ३०, १८० दिवस)

२) १६ ते २५ वयोगटातील महिलांनी सुध्दा एचपीव्हीचे तीन डोस लसीकरण करून घ्यावे.
३) २५ वयानंतर सर्वच महिलांनी पॅपस्मिअर टेस्ट करून घ्यावी.
या तीन गोष्टी गर्भाशय मुखाचा कर्करोगच होऊ नये आणि समजा झालाच तर शून्य पायरीवरच त्याला रोखून धरणे. यासाठी शून्य पायरीवरच कर्करोगाचे निदान करवून घेण्यासाठी पॅपस्मिअर तपासणी २५ वयानंतर करून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण सर्वांनीच या कर्करोगाविषयी जागृत रहा, काळजी घ्या व निरोगी रहा.

डॉ.सौ. सपना कौस्तुभ परताणी
(स्त्री रोग तज्ञ)
परताणी हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार मार्ग,
बसस्थानक जवळ, परभणी ४३१४०१.
मो.नं. ८६९८३४९९६६ ९४२२१९२२६६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR