दरीबडची : दुष्काळग्रस्त जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील रहिवाशांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाण्यासाठी साकडे घातले आहे. पाणी द्या आणि आम्हाला कर्नाटकात सामावून घ्या अशी हाक दिली आहे. महाराष्ट्र सरकार आम्हाला पाणी देत नाही. पाणी मागून कंटाळलो आहोत. आता आम्हाला कर्नाटकात घ्या अशा आशयाचे फलक घेऊन जतच्या दुष्काळग्रस्त शेतक-यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतले.
जतच्या सीमेवरील कोट्टलगी (ता. अथणी) येथे अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. कृष्णा नदीतून पाणी घेणारी ही ११७६ कोटींची योजना आहे. या कार्यक्रमात जत पूर्व भागातील मुचंडी, सिध्दनाथ, दरीबडची, उमदी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, अंकलगी, तिकोंडी, भिवर्गी, करजगीसह २५ ते ३० गावांतील दुष्काळग्रस्त फलक घेऊन गेले होते. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साकडे घातले. अम्माजेश्वरी जलसिंचन योजनेद्वारे जत पूर्व भागातील गुड्डापूर, मुचंडी, दरीबडची अशा ४२ गावांतील ३० हजार हेक्टर शेतीक्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येऊ शकते, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो असे या शेतक-यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे सत्ताधारी फक्त कोरड्या घोषणा देण्यापलीकडे काहीही करत नसल्याने जत तालुका पाण्याविना होरपळत आहे. त्यामुळे कर्नाटकनेच आम्हाला आश्रय द्यावा असेही शेतकरी म्हणाले.