सोलापूर – प्रशांत वसंत इंदापुरे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अक्षय जनार्धन महांकाळ (वय २६, रा. गोदूताई विडी घरकुल) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
फिर्यादीचा भाऊ प्रशांत इंदापुरे याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याच्या पॅन्टच्या खिशात चिठ्या मिळून आल्या होत्या. आरोपी अक्षय महांकाळ, मृताची पत्नी अस्मिता इंदापुरे, तिचे वडील ज्ञानेश्वर काडगी, भाऊ अक्षय काडगी यांनी प्रशांत यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, प्रशांत यास प्रचंड मानसिक त्रास दिला, वगैरे मजकूर चिठ्ठीमध्ये नमूद होता. आरोपींच्या त्रासामुळे प्रशांत याने गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद भाऊ नितीन इंदापुरे याने एमआयडीसी पोलिसांत दाखल केली.
त्यात आरोपी अक्षय महांकाळ यास पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन मिळण्याकरिता कोर्टात अर्ज दाखल केला.आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्रा धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. श्रीपाद देशक, अॅड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे अॅड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.