मंगळवेढा – फटेवाडी येथे लग्नात मानपान केला नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा सासरी छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती प्रशांत दशरथ लेंडवे, दीर प्रमोद दशरथ लेंडवे, सासू शोभा दशरथ लेंडवे (सर्व रा. फटेवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. २४ वर्षीय महिलेचे लग्न २४ डिसेंबर २०२१ रोजी प्रशांत लेंडवे याच्यासोबत झाले होते.
लग्नात फिर्यादीच्या वडिलांनी रितीरीवाजाप्रमाणे मानपानही केला होता. लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदण्यासाठी गेली होती. लग्नानंतर पाच ते सात महिने विवाहितेस आरोपींनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर मात्र तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही,लग्नात सोने घातले नाही म्हणून वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक त्रास करु लागले. फिर्यादीचे चुलते तसेच गावातील प्रतिष्ठित लोकांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पुन्हा माहेरातून सोने घेऊन ये म्हणून त्रास देऊ लागले.
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्राकडे आरोपी विरुध्द फिर्यादीने तक्रारी अर्ज केल्यावर आरोपींना बोलावून त्यांना तेथील समुदेशन केंद्रातील महिलांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी काहीही न ऐकता तू जर माहेरातून सोने आणले नाही तर तुला नांदवणार नाही असे म्हणून फिर्यादीस वडिलाकडे सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.