सोलापूर: मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आक्रमक झाला आहे. राज्यभर मराठा समाज सर्वच पक्षाच्या नेत्यांना विरोध करत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभा उधळून लावण्यासारख्या घटना राज्यभर घडत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची मोहोळ तालुक्यातील वाघोली गावात सभा आयोजित होती. प्रणिती शिंदे आल्या असल्याची माहिती होताच गावातील मराठा बांधव विरोध करण्यासाठी ताबडतोब सभास्थळी दाखल झाले.
मराठा समाज बांधव विरोध करतील, याचा अंदाज येताच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाषण करताना ताबडतोब एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, आमच्या मागण्या मान्य करा किंवा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा स्वतः प्रणिती शिंदेंनी देण्यास सुरुवात केली. विरोध करण्यासाठी आलेले मराठा बांधव देखील संभ्रमात पडले होते. वाघोली येथे आमदार प्रणिती शिंदे सभेसाठी आल्या होत्या. गावातील मराठा बांधवानी प्रणिती शिंदेंची सभा सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन विरोधक म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय प्रश्न मांडला? असा सवाल उपस्थित केला.
आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे प्रश्न विधानसभेत मांडले त्याबाबत आठवण करून दिली. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीला संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे सांगत मराठा बांधवाची समजूत त्यांनी काढली. वाघोली येथील मराठा समाज बांधवांनी लोकसभेच्या इच्छुक उमेदवार आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी याला सहमत आहात की नाही असं विचारताच प्रणिती शिंदेंनी संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीरपणे सांगितले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना होकार देताच मराठे माघारी निघाले.