बोरगाव : एका फोनवर माझाही पहाटेचा शपथविधी होईल; पण मी शरद पवार यांचा विश्वासघात करणार नाही. देशात भ्रष्टाचाराचा नवा फंडा आला आहे. उद्योगपतींकडून बाँडच्या व देणगीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा निधी पक्षाला देणगीच्या स्वरूपात जमा केला जातोय.
हा भ्रष्टाचार नाही का..? असा प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला. बोरगाव (ता. वाळवा) येथे विकासकामांचे उद्घाटन, बिरोबा सोसायटीचा शताब्दी समारंभ व बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे अध्यक्षस्थानी होते.
पाटील म्हणाले, देशातील चार-पाच उद्योगपतींची कोटीची संपत्ती हजारो कोटींच्या घरात कशी गेली, त्यांची चौकशी कोण करणार..? देशाचे कर्ज बुडविणा-या उद्योगपतींचे २५ लाख कोटींचे कर्ज माफ केले जाते, पण आमच्या शेतक-याचे व्याजही माफ होत नाही. याउलट शेतक-यांच्या खतांवर जीएसटी लावला जातो. ही बाब लाजिरवाणी आहे. या सरकारने गृहिणींच्या वस्तूंवरही जीएसटी लादला आहे. स्वातंत्र्यानंतर देशावर ५६ कोटींचे कर्ज होते.
आज ते २०५ लाख कोटी झाले आहे. अशी परिस्थिती असताना शेतक-यांचे कर्ज माफ केले असते, तर किती फरक पडला असता, कर्जमाफी फक्त शरद पवार हेच करू शकतात.
रिकाम्या टाक्या स्वयंपाकास बसायला..
काँग्रेसच्या काळात ४५० रुपयांना मिळणारा गॅस भाजपने धुरापासून मुक्तीची जाहिरात करून झोपडीत पोहोचवला आणि त्याची किंमत १,२०० केली. यामुळे पुन्हा गॅस भरून घेण्याऐवजी महिला रिकाम्या टाकीचा वापर जेवण बनविण्यासाठी बसायला करू लागल्या आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.