मुंबई : देशाची अवस्था अत्यंत बिकट असून लोकशाही व संविधान संपवून जनतेला महागाई व बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहे. शेतक-यांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आतापर्यंत देशाला दिशा दाखवण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे.
यावेळीही महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार आहे. भाजपच्या लोकसभेच्या १५० जागाही निवडून येणार नाहीत. भाजपचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकार खाली खेचण्याची भावना जनतेची झाली आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात येत आहे. १४ जानेवारीला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली. या यात्रेने ५९ व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवरील सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नंदुरबार जिल्हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्यातून काँग्रेसचा उमेदवार नेहमी निवडून आला आहे. भाजपच्या कार्यपद्धती व विचाराविरुद्ध असलेल्या सर्वांनी एकत्र यावे ही भूमिका काँग्रेसची आहे. या विचाराचे लोक भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होत आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय केला आहे.
जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा असून कोणतेही मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे व बाळासाहेब थोरात हेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत.