निलंगा : प्रतिनिधी
कुणबी मराठा सगेसोयरे व हैद्राबाद गॅजेटला मान्यता देऊन मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. बुधवारी दि १३ मार्च रोजी गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की , सगेसोय-यांचा आदेश काढतो म्हणून पाठीत खंबीर खुपसला. ईडब्ल्यूएस व ओबीसी आरक्षणातून वगळून न टिकणारे १० टक्के आरक्षण दिले. फडणवीस सरकारने २०१८ ला १३ टक्के व २०२४ ला १० टक्के न टिकणारे आरक्षण देऊन मराठ्यांची फसवणूक केली. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचे होते तर किमान १४ टक्के आरक्षण द्यायला पाहिजे होते. मात्र न टिकणारे १० टक्के आरक्षण देऊन डाव साधला. मराठ्यांच्या लेकरांचे वय निघून जात आहे. नोकरी मिळत नाही. सरकार खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.
विनाकारण आई-बहीणीबद्दल बोललो म्हणून माझ्यावर आक्षेप ठेवला मात्र नेहमीच्या उपोषणामुळे चीडचीड झाली असून चुकून शब्द गेला असला तरी माफी मागितली आहे परंतु आमच्या आई बहीणीवर लाठीचार्ज करून डोकी फोडली. गोळीबार केला यात महिला जखमी झाल्या त्यांची माफी कोण मागणार असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. कपटी सरकार अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करण्याऐवजी जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी करत मराठा आरक्षण मोडीत कढण्याचा प्रयत्न केला .त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्यावर एसआयटीची चौकशी लावली यापेक्षा मोठे दुर्दैव काय ? असा सवाल उपस्थित करत आगामी निवडणुकीत या सत्ताधा-यांना आपल्या दारात येऊ देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.