नवी दिल्ली : दिल्लीत भीषण आगीची घटना घडली आहे. दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका ४ मजली इमारतीला आज (ता. १४) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. मात्र, या आगीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५.२२ च्या सुमारास गीता कॉलनीतील शास्त्रीनगर, सरोजिनी पार्क, गल्ली क्रमांक १३ येथील घर क्रमांक ६५ मध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक पोलिस ४ फायर इंजिन, रुग्णवाहिका आणि ३ पीसीआर व्हॅनसह घटनास्थळी पोहोचले. इमारतीत अडकलेल्या दोन मुलांसह नऊ जणांना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि जवळच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
ज्या इमारतीत आग लागली ती चार मजली असून तळमजल्यावर कार पार्किंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्किंगमध्ये आग लागली आणि संपूर्ण इमारतीत धूर पसरला. रस्ता अरुंद असूनही अग्निशमन दलाच्या अधिका-यांना घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सर्व मजले शोधण्यात आले. तेथून तीन पुरुष, चार महिला आणि दोन मुलांना बाहेर काढून हेडगेवार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.