नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा यावेळी शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.
त्याचबरोबर अजित पवार गटाने शरद पवार यांच्या छायाचित्राचा वापर करु नये. अशा शब्दांत कोर्टाने अजित पवार गटाचे कान टोचले आहेत. तुम्ही त्यांच्या फोटोचा वापर का करता असा प्रश्नही विचारला आहे. तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रकारे शरद पवार यांचा फोटो किंवा चिन्ह वापरु शकत नाही असेही कोर्टाने म्हटले आहे.
तुमच्या पक्षाला आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी (एनसीपी) अशी ओळख मिळाली असताना तुम्ही एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो का वापरता असा सवालही कोर्टाने अजित पवार गटाला विचारला आहे.
शरद पवार गटाकडून वकील मनु स्ािंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसे वापरतात. ही फसवणूक आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे शरद पवार यांचा फोटो वापरलेले पोस्टर्स देखील दाखवले.
ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे? असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु स्ािंघवी यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत अस लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार १८ मार्च रोजी होणार आहे.