24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरशिवसेनेचे शिंदे गटाचे संजय कोकाटे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय कोकाटे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माढ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच चोवीस तासांच्या आत महायुतीला धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले.

शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडताना त्यांनी आपले पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवरही आरोप केले आहेत.
माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही. मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही. उलट युती म्हणून शिवसेना उमेदवाराचे काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संबंधित नेत्याने आमच्या विरोधात काम केले आहे, त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याची भूमिका संजय कोकाटे यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप कोकाटे यांनी केला. त्यातूनच आपण आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देत आहोत, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

विजय शुगर कारखान्याच्या विक्री प्रकरणात संबंधित नेत्याने आमदार बबनराव शिंदे यांचे हित पाहिले. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे आणि शेअर्स रक्कम याकडे डोळेझाक करण्यात आली. हेच नेते मला आणि नागनाथ कदम यांना शिंदे यांच्याविरोधात तक्रारी करायला लावायचे आणि दुसरीकडे टेंभुर्णीच्या फार्म हाऊसवर शिंदेंचा पाहुणचार घेऊन तडजोडी करत होते, असाही आरोप कोकाटे यांनी केला आहे.

आमदार शिंदे यांच्या भ्रष्टाचारी आणि जुलूमी राजवटीला जे पक्ष आणि व्यक्ती सहकार्य करतील, ते आमचे विरोधी पक्ष या नात्याने आम्ही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. विचारांशी गद्दारी शक्य नाही, लुटारूंना साथ देणं शक्य नाही, भाजपचा प्रचार करणं शक्य नाही!, असे म्हणत कोकाटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो. कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR