कोल्हापूर : प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी याबाबत अंतिम चर्चा होऊन माने यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. स्वत: माने यांनीही याला दुजोरा दिला आहे.
माने यांना बुधवारी सकाळी तातडीने मुंबईला बोलावून घेण्यात आले होते. याच दरम्यान ही जागा भाजप आपल्याकडे खेचून घेऊन येथून शौमिका महाडीक यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अंतिम बैठक होऊन यामध्ये कुठल्या जागा कोणाला याची निश्चिती झाली.
यानंतर रात्री दीड वाजता धैर्यशील माने आणि शिंदे यांची भेट झाल्यानंतर पहाटे माने यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेले महिनाभर विद्यमान खासदार माने यांच्या उमेदवारीबद्दल ज्या शंका- कुशंका उपस्थित केल्या जात होत्या, त्याला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे दोन्ही विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.