मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अठरा महिन्यांत २८ कोटी १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला. या प्रवासाची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने १ हजार ४४४ कोटी ५३ लाख रुपये एसटीला अदा केले आहेत.
देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून राज्यभरात अमलात आणली. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने ज्येष्ठांनी त्याचा चांगला लाभ घेतला. या योजनेमधून मिळालेली प्रवासी संख्या एसटीसाठी लाभदायी ठरली.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार बसेस होत्या. हळूहळू त्या आज १५ हजारांवर आल्या आहेत. त्यातीलही दररोज दोन ते अडीच हजार बसेस विविध कारणांमुळे रस्त्यावर धावत नाहीत. प्रत्यक्षात १३ हजार ५०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. महामंडळाच्या बसमधून दररोज ५० ते ५२ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.
किलोमीटरवर भर
गर्दीच्या हंगामात दररोजचे किलोमीटर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. एका बसची फेरी २०० किलोमीटर असेल तर ती ३०० किलोमीटर करून बसमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.