36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ७ आरोग्यवर्धिनी केंद्रांना (आरोग्य उपकेंद्र) हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम पुरस्कार पटकावला आहे. सन २०२२-२३ वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने केली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले की, सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात, तेथे कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांनी आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आरोग्य संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणा-या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.

जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून, या पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये एवढी आहे. गेल्यावर्षी हा प्रथम पुरस्कार गणोरी आरोग्य केंद्राने पटकाविला होता. यंदा गणोरी, आळंद, दौलताबाद, गदाना, सिद्धनाथ वडगाव, जातेगाव, करंजखेडा आणि वेरूळ या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले असून, त्यांंना प्रत्येकी ५० हजारांचे रोख पारितोषिक मिळाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR