पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने १ एप्रिलपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये ‘जनसंवाद यात्रा’ सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासमोर अद्यापि महाविकास आघाडीने उमेदवार घोषित केलेले नाहीत, तर लंके कुटुंबापैकी कोण निवडणूक लढणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
दोन महिन्यांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी पाथर्डी या ठिकाणाहून अशाप्रकारची यात्रा सुरू केली होती व त्याचा समारोप नगर येथे करण्यात आलेला होता. यात्रेदरम्यान त्यांनी आम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने १ एप्रिलपासून ‘जनसंवाद यात्रा’ लोकसभा मतदारसंघामध्ये केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये ही यात्रा जाणार आहे.
साधारणत: दोन ते तीन मुक्काम येथे प्रत्येकी तालुक्यामध्ये होणार आहेत. यात्रेचे ठिकाण व मार्ग नेमका कशा पद्धतीने राहील, याचे नियोजन आखले जात आहे. पाथर्डीच्या मोहटादेवीपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेमध्ये अनेक जण सहभागी होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.