मुंबई : प्रतिनिधी
बारामतीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी अपक्ष खासदारकी लढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शिवतारेंच्या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा तिढा निर्माण झाला होता.
पण विजय शिवतारे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी शिवतारेंची समजूत काढण्यात तिन्ही नेत्यांना यश आल्याचे म्हटले जात आहे.
विजय शिवतारे यांचे बंड थंड केले असून रात्री ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत शिवतारे यांची नाराजी दूर झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांची समजूत घालत त्यांची नाराजी दूर केली. पंतप्रधान मोदींच्या ४०० पारच्या मोहिमेत अडथळा आणू नका असे म्हणत तिघांनी समजावल्याची माहिती समोर येत आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे शरद पवारांची खेळी यशस्वी होतेय आणि याचा फटका महायुतीला होतो असे शिवतारेंना सांगण्यात आल्याची माहिती समजते.
अजित पवारांना विरोध म्हणजेच शरद पवारांची खेळी यशस्वी होत आहे. यामुळे महायुतीचे नुकसान होत आहे. सर्वांमध्ये मतभेद आहेत, पण वचपा काढण्याची ही वेळ नाही अशा शब्दांत विजय शिवतारेंची समजूत काढण्यात आली. महायुतीची बैठक आता होणार असून या बैठकीनंतर विजय शिवतारे यांची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित राहू शकतात.