नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.
रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (२७ मार्च) संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला.
दरम्यान, रश्मी बर्वेंच्या एबी फॉर्मवर दुस-या क्रमांकावर त्यांच्या पतीचे नाव देण्यात आले होते. रश्मी बर्वेंचे प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांचे नाव देण्यात आले होते. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकचे विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे तिकिट कापत काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पारवे विरुद्ध बर्वे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
रामटेकचे महत्त्व काय?
रामटेककडे विदर्भातील नागपूरनंतरचा सर्वांत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून पाहिले जाते. नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहर वगळता उर्वरित ग्रामीण आणि निमशहरी भाग हा रामटेकमध्ये मोडतो. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता. रामटेक लोकसभेवर काँग्रेसचे नेहमीच प्राबल्य राहिले. १७ लोकसभांपैकी १२ लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.