पुणे : ‘केरसुणी’ हा शब्द कानावर पडला, की शिंदाडच्या पानापासून बनविलेल्या झाडूची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जुन्या काळी शेणामातीची घरे असताना याच केरसुणीने घरातील साफसफाई केली जात. काळ बदलला, टाइल्स आणि आता मार्बल आले. सोबत नवीन पद्धतीचे झाडूही आले. परंतु आजही केरसुणीला ‘लक्ष्मी’ म्हटले जाते.
लक्ष्मीपूजनाला देवासमोर पूजेचा मान ‘केरसुणी’लाच आहे. त्यामुळे बाजारात केरसुणी आज मानाचा भाव खात आहे. कच्चा माल दिवसें दिवस कमी पडत असल्याने केरसुणीच्या दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, दिवाळी सण सुरू आहेत. खरेदीसाठी बाजार गजबजली आहेत. याच गर्दीत केरसुणी विक्रेत्यांची दुकानेही रस्त्यावर लागली आहेत.अगदी देवघरात सफाईसाठी लागणा-या छोड्या झाडीपासून थेट घर सफाईसाठी लागणा-या मोठ्या केरसुणीचे ढीग विक्रेत्यांनी लावले आहेत.
केरसुणी विक्रीसाठी ढीग दिसत असले तरी एक केरसुणी बनविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. शेतीलगत असलेली शिंदाडची झाडे विकत घ्यावी लागतात. त्या शिंदाडच्या झाडाची पाने गोळा करून त्यापासून केरसुणी बनवावी लागते. परंतु यंदा पावसाअभावी शिंदाडाची झाडे कमी झाली आहेत.