पुणे : प्रतिनिधी
यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणा-या मातीच्या माठांना बाजारात मागणीही तेवढीच वाढली आहे. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कुंभार व्यावसायिकांनी वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्याचा सुरुवातीलाच उन्हाचे चटके जाणवू लागल्यानं मातीच्या माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच माठ बनवण्यासाठी लागणा-या मातीसह भुशाच्या किमतीतही यंदा वाढ झाली आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या माठांना पसंती
सध्या बाजारात तोटी असलेल्या माठांना ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात प्रामुख्याने काळे माठ बनविले जातात. मात्र, ग्राहक राजस्थान, गुजरातमधील लाल आणि नक्षी असलेल्या माठांनाही पसंती देत असल्याने पारंपरिक माठांसह विविध प्रकारचे माठही बाजारात बघायला मिळतात.