26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरशाश्वत मूल्यांचे भान करुन देण्याचे काम साहित्य करते

शाश्वत मूल्यांचे भान करुन देण्याचे काम साहित्य करते

लातूर : प्रतिनिधी
चांगले जीवन जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी मनाचा विकास झाला पाहिजे; ते करण्याचे काम साहित्य करते. म्हणून नवोदित लेखक विद्यार्थ्यांनी साहित्याचा पाठलाग सातत्याने केला पाहिजे. कारण खरे साहित्य हे शाश्वत जीवनमूल्यांची जाणीव तर करुन  देतेच त्याचबरोबर जीवन जगण्याचे आत्मभान जागृत करुन देण्याचे कार्यही करीत असते. साहित्याचे प्रयोजनच मुळात शाश्वत मूल्यांची भान देण्याचे काम करणे हे असते, असे प्रतिपादन डॉ . नागोराव कुंभार यांनी केले.
शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त्त विद्यमाने नवोदित लेखकांसाठी मराठी विभागाद्वारे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते तर व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. संभाजी पाटील, नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर व विद्यार्थी वांड्मय मंडळाची अध्यक्षा विशाखा सोमवंशी हे होते.
पुढे बोलताना डॉ. नागोराव कुंभार म्हणाले की, प्रत्येकालाच आपल्या मनाचा विकास व्हावा, चांगले जीवन जगता यावे असे वाटते. त्याची पुर्तता होण्यासाठी आई-वडील, थोर मंडळी यांच्याशी सुसंवाद वाढवला पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकून चिंतनशीलता वाढवली पाहिजे. तर उत्तम लेखक व्हाल. लेखन करणे ही एक तपश्चर्य असून जीवनाचे वास्तव मांडणारे व समकाल चित्रित करणारे साहित्य आपणाला लिहिता आले पाहिजे, लेखक म्हणून घडण्यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. संभाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. विजयकुमार करजकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. गोविंद उफाडे, प्रा. बापूसाहेब जवळेकर, डॉ. शिवराज काचे विद्यार्थी मंडळाचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR