25.4 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार दिलीप माने स्वगृही

माजी आमदार दिलीप माने स्वगृही

मुंबई : दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे रविवारी (ता. ३१ मार्च) पाच वर्षांनंतर स्वगृही काँग्रेस पक्षात परतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माने यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माने यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फायदा सोलापूर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. त्यामुळे माने यांची दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकद शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.

दिलीप माने यांनी २८ऑगस्ट २०१९ रोजी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेची२०१९ ची निवडणूक त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकिटावर लढत दिली होती. मात्र, शिवसेनेचे महेश कोठे यांनीही अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदे यांना झाला. शिवसेनेचे कोठे आणि माने या दोघांचाही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेपासून अंतर राखून होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची आजही घट्ट मैत्री आहे. त्यातूनच जेव्हा अजित पवार हे सोलापूर दौ-यावर आले होते, तेव्हा त्यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार आज मुंबईत त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला.

दिलीप माने विधानसभेला दक्षिण सोलापूरमधून २००९ मध्ये निवडून आले होते. मात्र, पुढील २०१४ च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत ते भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. पुढे शिवसेनेत प्रवेश आणि मधली काही वर्षे सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर राखून वागणारे माने यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट आहे.

प्रणिती शिंदेंना होणार फायदा
दिलीप माने यांचे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात नेटवर्क आहे. माने हे मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे सभापती, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी कार्यकर्ते आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR