19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरभावी नवरदेवासह बहीण, भाची अपघातात जागीच ठार

भावी नवरदेवासह बहीण, भाची अपघातात जागीच ठार

रेणापूर : प्रतिनिधी
अगदी काही दिवसावर  आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला संभाजीनगरहून लातूरकडे निघालेल्या एसटी बसने जोरांची धडक दिल्याने दुचाकीवरील भावी नवरदेव त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील वाघाळा पाटी जवळ  रविवारी (दि. ३१) सायंकाळी ७  वाजण्याच्या सुमारास घडली .
रेणापूर तालुक्यातील  बिटरगाव तांडा  येथील सेवालाल पंडित राठोड (वय २२ वर्ष ) या तरुणाचा रविवारी दि . २८ एप्रिल रोजी विवाह असल्याने  या विवाहाची  जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल रविवारी त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणा-या लातूर- छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक अपत्य होते. या अपघातानंतर तिघानाही अंबाजोगाई येथील  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली. शवविच्छेदन केल्यानंतर तिघाचे पार्थीव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सोमवारी दि. १ एप्रिल रोजी अगोदर बहीण व भाचीवर राडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर सेवालाल याच्या पार्थीवावर बिटरगाव तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वार्ता कळताच सर्वत्र हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR