मुंबई (प्रतिनिधी) : भाजपा नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन राज ठाकरे मुंबईला परतले तेव्हा ते महायुतीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे समजले गेले; पण या बहुचर्चित भेटीला दोन आठवडे झाले तरी अजूनही मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत संभ्रम आहे. मनसेला लोकसभेची केवळ एक जागा सोडण्याची राज्यातील नेत्यांची तयारी आहे त्यामुळे युतीत जायचे की नाही, याबाबत मनसे द्विधा मन:स्थितीत आहे. सन्मानाने युती होत नसेल तर आपली ताकद असलेल्या मतदारसंघात स्वबळावर लढावे यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा वाढत असल्याने राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. तब्बल ४० मिनिटे या दोघांची चर्चा झाली होती. या भेटीच्या वेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील उपस्थित होते. मनसेला सोबत घेण्यासाठी राज्य पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतरच अमित शाह यांनी राज ठाकरे यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात होते. मनसेने लोकसभेच्या दोन जागा मागितल्या होत्या; पण नाशिकची जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी ठाम नकार दिल्याने दक्षिण मुंबईची एकच जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली होती.
याबाबत राज ठाकरे फारसे समाधानी नाहीत त्यामुळे त्यांनी महायुतीतील सहभागाचा निर्णय प्रलंबित ठेवल्याची चर्चा आहे. येत्या एक-दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर राज ठाकरे भाजपाला पाठिंबा देऊन शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या विरोधात ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईसह ११ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.