27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रसुळेंनी मानले आंबेडकरांचे आभार

सुळेंनी मानले आंबेडकरांचे आभार

एकत्रित काम करण्याची दिली ग्वाही

बारामती : महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाबाबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असे असतानाही महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका वंचितने घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचितने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार निवडणुकीसाठी दिलेला नाही.

पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे शहर या चार मतदारसंघांपैकी पुणे आणि शिरूर मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना शिरूरमधून वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात यामुळे तिरंगी लढत होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र वंचितने आपला उमेदवार उभा न करता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेले आणि उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा मिळवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित दादा पवार आपली ताकद लावत आहेत.

बारामतीमध्ये वंचित महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने प्रसिद्ध केलेल्या पत्रात सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद केले आहे. वंचितने घेतलेल्या या भूमिकेचे खासदार सुळे यांनी स्वागत केले असून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे …
‘बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करू ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR