छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचा पेपर बुधवारी सकाळी १० वाजता होता.
या पेपरला हिंदी द्वितीय भाषा विषयाच्या जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा एकच धावपळ सुरू झाली. विविध महाविद्यालयांतून परीक्षा विभागाला कळविण्यात आले. दीड तासाच्या गोंधळानंतर नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठविण्यात आल्या. त्यानंतर पेपर सुरळीतपणे पार पडल्याची माहिती महाविद्यालयातून देण्यात आली.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. बुधवारी बी. कॉम. प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाचा पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर सकाळी १० वाजता होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जुन्या अभ्यासक्रमांची म्हणजेच पॅटर्न-२०१८ कोड क्र. २०१६ ही प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवली. त्याच प्रश्नपत्रिकेवर पॅटर्न-२०२२ असेही लिहिण्यात आले होते.
मात्र, परीक्षेला सुरुवात होताच विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ या विषयाच्या प्राध्यापकांना कळवले. त्यानंतर अर्ध्या तासातच परीक्षा विभागाने झालेली चूक मान्य करत काही वेळातच नवीन पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ११:३० वाजता नवीन अभ्यासक्रमाचा पेपर संबंधितांना मिळाला. त्यानंतर ११:३० ते १:३० यावेळेत परीक्षा सुरळीतपणे पार पडली.