आपल्या संस्थेला लाखोंचे अनुदान मिळविले
शिर्डी : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या संस्थेला लाखो रुपयांचे अनुदान मिळवून दिल्याचा आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला. याशिवाय त्यांनी लोखंडेंची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधीच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड आणि अन्य संस्थांकडे असलेला निधी आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत. असे बेकायदेशीर कर्ज वितरण करणा-या सर्व संस्थांची कॅग, ईडीसारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळवणा-या व्यक्ती आणि वितरण करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी केली.
खा. सदाशिव लोखंडे यांच्या अधिपत्याखालील खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्यूसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई या संस्थेच्या संचालकपदी त्यांच्या एकाच कुटुंबातील ५ जण संचालक आहेत. पत्नी-नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा-प्रशांत सदाशिव लोखंडे, सून-प्रियंका प्रशांत लोखंडे, मुलगा-राज सदाशिव लोखंडे, सून-अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपदी कुटुंबातीलच १० जण आहेत.
नियमांचे उल्लंघन
संचालक पदावर एका कुटुंबातील दोन व्यक्तीदेखील असू नयेत, असा नियम असताना नियमांना बगल देत या कंपनीला केंद्र शासनाचे ३२ कोटीपेक्षा जास्त रुपयाचे कर्ज दिले. त्यापैकी १६ कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे, जे बेकायदेशीर आहे. सामान्य शेतक-यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज आणि अनुदान नाकारले जाते. लोखंडे यांनी हे अनुदान केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत मिळवलेले आहे.