24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले होणार लोकसभेचे उमेदवार!

राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले होणार लोकसभेचे उमेदवार!

धुळ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. आता काँग्रेसच्या इच्छुकांनी बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष उमेदवारीबाबत गोंधळलेला दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी एक नवा पर्याय सुचविला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाला सोडला आहे. या पक्षाकडे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे दोघे इच्छुक आहेत. त्यामध्ये आता नाशिकच्या माजी महापौर व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची भर पडली आहे. अद्यापही प्रबळ उमेदवार नसल्याने काँग्रेसचे पदाधिकारी संभ्रमित आहेत. त्यातच आता डॉ. शेवाळे यांनी पक्षाने मतदारसंघातीलच उमेदवार द्यावा, बाहेरचा उमेदवार देऊ नये. त्याला प्रतिसाद मिळणार नाही, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतमतांतरे आहेत.

धुळे मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. भामरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार कोण, हे अद्याप ठरत नाही. त्यामुळे यात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी एक नवा पर्याय सुचविला आहे. या पर्यायानुसार मालेगाव शहरातील ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले यांचा पर्याय दिला आहे. यावर गांभीर्याने चर्चा झाल्यास महाविकास आघाडीला एक प्रभावी उमेदवार मिळू शकेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख तसेच धुळ्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन धुळे मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांना याबाबतचा संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR