अहमदनगर : गावाजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रोड नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी नागरिक समोर येताना पाहायला मिळत आहेत. अहमदनगर शहराशेजारी असलेल्या वाघवाडी येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीचा रस्ता मिळावा यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगरपासून साधारण २० किलोमीटरवर असलेल्या वाघवाडी या गावातील लोकसंख्या साधारण ११५० इतकी आहे. गावामध्ये ६०० मतदार आहेत. छोटे गाव असल्यामुळे जेऊर बायजाबाई ही ग्रामपंचायत वाघवाडी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता.
काही दिवसांपूर्वी वन विभागाची दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांना मिळाली आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने स्मशानभूमी मिळूनही ग्रामस्थांना अन्त्यविधीसाठी जेऊर गावातील स्मशानभूमीकडे तीन किलोमीटर लांब जावे लागते.