नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) निवड समिती सदस्य मोहम्मद युसूफ आणि अब्दुल रझाक यांना या महिन्याच्या अखेरीस न्यूझिलंडविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी अनुक्रमे अंतरिम मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दीर्घकालीन मुख्य प्रशिक्षकपदासाठी परदेशी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांच्याशी चर्चा सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीसीबीच्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, गिलेस्पीशी चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे कारण त्याने रेड-बॉल फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. कर्स्टन इंडियन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याशी चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. गिलेस्पीनी सहमती दर्शविली आहे परंतु त्यांची फी आणि ते पाकिस्तानमध्ये किती दिवस उपस्थित राहणार याविषयी अटी ठेवल्या आहेत,असे सूत्राने सांगितले.