28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपटोले यांचा प्रस्ताव अमान्य, आंबेडकर यांचे स्पष्टीकरण, सुळेंना पाठिंबा कायम

पटोले यांचा प्रस्ताव अमान्य, आंबेडकर यांचे स्पष्टीकरण, सुळेंना पाठिंबा कायम

अकोला : प्रतिनिधी
नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे, त्यामुळे पटोलेंच्या प्रस्तावावर आता कोणताही निर्णय होणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माझे भांडण हे शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही. त्यामुळे आम्ही बारामतीत त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत अ‍ॅड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले होते. तसेच ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनीही आंबेडकर यांना आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते. परंतु अ‍ॅड. आंबेडकर यांनी पटोले यांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. पण राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राजकारण हे व्यक्तीगत स्तरावर होत असेल तर ते चुकीचे आहे. राजकारण हे पक्षाच्या स्तरावर होणे आवश्यक आहे. माझे भांडण हे शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही. शरद पवारांनी आतापर्यंत आपल्या पक्षाचे नुकसान केले, सुप्रिया सुळे यांनी वंचितचे कोणतेही नुकसान केलेले नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय नाही असा आरोप करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाची जी चर्चा सुरू आहे, त्यावरून एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचे दिसते. एकमेकांना आम्ही तुला दाखवून देऊ, अशी धमक्यांची भाषा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा
अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये रिपब्लिनक सेनेचे आनंदराज आंबेडकरांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. या आधी आनंदराज आंबेडकरांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR