मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून १६ एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध जुने आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे सांगत माढयाबाबत ‘वेट अँड वॉच’ अशी प्रतिक्रिया दिली. धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या आधी शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूज येथे एक मेळावा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिल्यानंतर त्याला धैर्यशील मोहिते पाटलांनी विरोध केला होता. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण भाजपने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.