पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वा-यासह गारपिटीचा पाऊस कोसळला; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचा परिणाम पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला असून तापमानात चढ-उतार कायम आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळ असले; तरीही खेळत्या हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभर प्रामुख्याने आकाश निरभ्र होते. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानही पाहायला मिळाले. दुपारी बहुतांश ठिकाणी हवा खेळती होती. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस; तर कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील आठवडाभर तरी संपूर्ण जिल्ह्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहून सायंकाळी ढगाळ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या काळात उन्हाची तीव्रताही कायम राहणार आहे. आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. या प्रणालीत मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वा-यांची स्थिती मिसळली आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांखाली आले आहे.
या भागात ‘यलो अलर्ट’
राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
– लवळे, शिरूर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क : ४१.२
– पुरंदर, राजगुरुनगर, हडपसर, खेड, इंदापूर : ४०.१
– चिंचवड, शिवाजीनगर, पाषाण : ३९.५
– बारामती, तळेगाव, गिरवणे, हवेली : ३८.४
– आंबेगाव, दौड, भोर : ३७.८
– नारायणगाव, माळीण, निमगिरी : ३६.७
– लोणावळा : ३६