छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षरीत्या सरकारची कानटोचणी तर केलीच, शिवाय विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या. रावण व राम दोघेजण ज्ञानी होते. मात्र, रावणात प्रचंड अहंकार होता. ज्ञानी असूनही याच अहंकारामुळे रावण हरला असा टोला त्यांनी येथे लगावला.
स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीने उभारलेल्या रा. स्व. संघाच्या ‘समर्पण’ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले, जगाचे लक्ष आपल्या तत्त्वज्ञान व संस्कृतीवर गेले आहे. आपला राष्ट्रीय पुरुषार्थ वाढला आहे. त्याचा परिणाम आता दिसत आहे. विनातपस्या असे कार्य होत नाही. राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व देशाने अनुभवला; पण हे कार्य एका रात्रीतून घडले नाही. यामागे ५०० वर्षांचा संघर्ष होता.