दोन शिवसैनिकांत रंगणार लढत
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आहेत. गजानन कीर्तिकर सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल होणारे खासदार ठरले होते तर रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात अधिकृत जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणूनदेखील निवडून आले आहेत. ते मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.