नवी दिल्ली : इस्राइल आणि इराणमधील तणाव वाढल्यानंतर पश्चिम आशियामध्ये आणखी एका युद्धाच्या अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, इराणच्या निमलष्करी दलाने इस्रायली अब्जाधीश इयाल ओफरचे मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. आता या जहाजाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या जहाजावर १७ा भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. जहाजावरील भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत दिल्ली आणि तेहरानमधील राजनैतिक माध्यमांद्वारे इराणच्या अधिका-यांच्या संपर्कात आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की हे जहाज भारताच्या दिशेने येत होते आणि त्यात एकूण २५ क्रू मेंबर्स आहेत. इराणचे निमलष्करी दल असलेल्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्राईलशी संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याने या भागामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येणार होते असे बोलले जाते इराणचे सैनिक हेलिकॉप्टरमधून या जहाजावर उतरल्याचे समजते.
पोर्तुगालचा ध्वज असलेले ‘एमएससी अॅरिस’ हे जहाज लंडनमधील झोडियाक मेरिटाईम या कंपनीची असल्याचे समजते. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इयाल ओफेर यांच्या मालकीची आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने मात्र त्यावर कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. इराण २०१९ पासून सातत्याने मालवाहू जहाजांना लक्ष्य करत आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ओमानचे आखात असून हे पर्शियन आखाताचे मुख समजले जाते. जगातील तेलाचा व्यापार येथून चालतो. संयुक्त अरब अमिरातीचा पूर्व किनारा असलेल्या फुजैराह येथून तेलाचा व्यापार होतो. मागील काही दिवसांपासून या किना-यांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. येथील हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणलाच जबाबदार धरले आहे.