कोहिमा : नागालँडमधील दिमापूर जिल्ह्यातील नाहरबारी भागात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री १०:४५ वाजता घडली. या घटनेत अन्य घरालाही आगीने लक्ष केले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दिवाळीनिमित्त फटाके फोडल्याने आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन व आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या आगीत सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांना आग विझवण्यात यश आले. चौकशीनंतरच आगीचे कारण समजेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मृतांचे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.