सीरियाची राजधानी दमास्कस येथे एक एप्रिल रोजी इराणच्या दूतावासावर हल्ला चढवून इस्रायलने ‘इराणी रिव्होल्युशनरी गार्ड’च्या दोन जनरलसह सात अधिका-यांना ठार केले होते. हे कमांडर पॅलेस्टिनी जिहादींना भेटण्यासाठी दमास्कसमध्ये आल्याची माहिती इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाल्याने हा हल्ला चढविण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. इस्रायलच्या या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा इशारा इराणने दिला होता व रविवारी रात्री तो अखेर खराही करून दाखविला. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे व ड्रोनचा मारा केला. मात्र, यातील ९० टक्के क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात यश मिळाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. शिवाय इराणच्या या हल्ल्यास जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही इस्रायलने जाहीर केले आहे. या नव्या कुरापतींमुळे इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी इराणचा हल्ला रोखण्याचा क्षीण प्रयत्न केला पण तो मुळातच क्षीण असल्याने अपयशी ठरला. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी जी-७ गटातील देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.
मात्र, अशा बैठका व त्या बैठकांद्वारे दिले जाणारे इशारे यातून या देशांना चढलेला युद्धज्वर कमी होण्याची शक्यता नाहीच! अशा बैठकांचा परिणाम झाला असता तर एव्हाना इस्रायल-हमास युद्ध थांबायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात या युद्धाचे लोण आता शेजारी राष्ट्रांमध्ये पसरण्याची शक्यता वाढीस लागली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात इस्रायल-हमास युद्धाची भर पडली आहे आणि इराणच्या हल्ल्याने आता या युद्धाची व्याप्ती वाढण्याची धास्ती जगात निर्माण झाली आहे. हमासने इस्रायलवर हल्ला करून या युद्धाला तोंड फोडले हे मान्यच करावे लागेल. हमासच्या या हल्ल्यात १,१३९ इस्रायली मृत्युमुखी पडले, हे ही खरेच! मात्र, त्यानंतर इस्रायलने हमासचा संपूर्ण नायनाट करण्याची घोषणा करून सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये आजवर हजारो निरपराध नागरिक ठार झाले आहेत व आजही होतायत! गाझा पट्टीतील रुग्णालयांनाही इस्रायलने हल्ल्यातून सोडले नाही, हे ही तेवढेच खरे आहे. गाझातील नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करणा-यांनाही इस्रायलने लक्ष्य केले आहे. हे युद्ध थांबविण्यात अमेरिकेसह प्रमुख पाश्चिमात्त्य देश व संयुक्त राष्ट्रसंघाला सपशेल अपयश आले आहे, हे ही मान्य करावेच लागेल. त्यात आता इराणची झालेली ‘एन्ट्री’ जगाच्या डोक्याचा ताप वाढविणारीच ठरणार आहे. पश्चिम आशियातील राजकारणात इराण हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी देश आहे.
अमेरिका व इस्रायल हे आपले शत्रू असल्याचे इराणने स्पष्टपणे जाहीर करून टाकले आहे. आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली १९७९ मध्ये झालेल्या धार्मिक क्रांतीनंतर या ‘इस्लामिक क्रांती’चे रक्षण करण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड (आयआरजीसी)ची स्थापना करण्यात आली. या पथकातील सैनिकांची बांधीलकी इराणच्या मुख्य लष्कराशी नव्हे तर इराणी धर्मगुरूंशी आहे. आजही इराणचे सैन्य व आयआरजीसीचे जवान समांतर काम करतात. आयआरजीसीकडे एक लाख नव्वद हजार प्रशिक्षित सैनिक आहेत. इराणच्या सर्व सीमांचे रक्षण करण्याबरोबरच संपूर्ण पश्चिम आशियात ‘शियापंथीयांचे जाळे’ मजबूत करण्याचे काम या सैनिकांवर सोपविण्यात आलेले आहे. पॅलेस्टिनी प्रदेशात हमास, इस्लामिक जिहाद, येमेनमध्ये हैती, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला अशा गटांशी आयआरजीसीचे लागेबांधे आहेत. प्रामुख्याने छुप्या युद्धाचे दहशतवादी तंत्र ते वापरत आले आहेत. मात्र, आता संघर्षाला गंभीर वळण लागले आहे. युद्धाची व्याप्ती किती वाढू शकते याची कल्पना यावरून येऊ शकते. इस्रायलला रोखण्यासाठी इराण, सीरिया, लेबनॉन हे देश आता उघडपणे पुढे सरसावण्याची शक्यता आहे. तरी त्या सर्वांच्या विरोधात लढायला आपण सज्ज असल्याची गर्जना इस्रायलकडून केली जाते आहे.
अर्थात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असल्याने इस्रायल मागे हटायला तयार नाही, हे उघडच आहे. रशिया-युक्रेन युद्धातही अमेरिकेकडून युक्रेनला अव्याहत शस्त्रपुरवठा सुरूच आहे. त्यातून आपल्या देशातील शस्त्रास्त्र व्यापा-यांचे हित अमेरिका जपते आहे. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर वाढत चाललेला युद्धज्वर कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अमेरिकी प्रशासन सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. त्यामागे अमेरिकेसारखी राष्ट्रे आपल्या हितसंबंधांचे संकुचित राजकारण पुढे रेटण्याचा जो प्रयत्न करतात ते प्रमुख कारण बनते आहे. त्यातून सगळ्या जगाचे स्थैर्यच धोक्यात येते आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जे तेलसंकट निर्माण केले आहे त्याने युरोपीय राष्ट्रांसह संपूर्ण जग अगोदरच मेटाकुटीला आले आहे. आता इराणच्या इस्रायल-हमास युद्धातील एन्ट्रीने तेलाच्या तुटवड्याबरोबरच जागतिक व्यापारावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याची झलकही लगेच पहायला मिळाली. होमर्झू सामुद्रधुनीजवळ इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाजाचे इराणच्या आयआरजीसीने अपहरण केले आहे. या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत. आता या नागरिकांना सोडवण्यासाठी भारताला राजनैतिक प्रयत्न करावे लागत आहेत. या नागरिकांची सुटका करण्यात भारताला यशही मिळेल.
मात्र, हा युद्धज्वर कमी न झाल्यास भारतासह अनेक देशांना त्याच्या तीव्र झळा सहन कराव्या लागू शकतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते. युद्धाचा भडका उडाला तर आधीच अशांत लाल समुद्रामुळे विस्कळीत झालेली युरोप व आखाती देशातील भारताची व्यापारी मालाची वाहतूक खर्चिक होण्याची व त्यामुळे भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताने तातडीने चिंता व्यक्त केली आहे व दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हा संयम दाखविण्यास कुणी तयार असल्याचे दिसत नाही. इस्रायलने इराणच्या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले तर इराण इस्रायलवर आणखी हल्ले करेल, असाच कयास व्यक्त केला जातो आहे. गाझा पट्टीतील युद्ध या सर्व परिस्थितीच्या मुळाशी आहे. ते थांबल्याखेरीज ही परिस्थिती सुधारणार नाही. त्यामुळे इस्रायलच्या युद्धज्वरास वेसण घालण्याची खरी गरज आहे. मात्र अशी वेसण कोण घालणार? हाच खरा प्रश्न आहे.