अमरावती : राजकारणात कुणी-कुणाचे फार काळ शत्रू नसते, असे म्हणतात. अमरावतीत मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर या म्हणीवर शिक्कामोर्तब झाले. सकाळी बुलडाण्यात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यानंतर थोड्याच वेळात काय चक्रे फिरली कुणास ठाऊक, पण त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. नवनीत राणा आणि रवी राणा हे थेट अभिजित अडसूळ यांच्या भेटीला गेले. त्यावरून आता दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे.
आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेससोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते. त्यांच्यात अडाणीपणा आहे. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला होता.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून नाराजी
अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून महायुतीतील काही नेते नाराज होते. प्रहारचे बच्चू कडू यांनी या मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. तर अडसूळ पित्रा-पुत्रांनी पण तलवार बाहेर काढली होती. अभिजित अडसूळ यांनी तर उमेदवारी अर्ज पण खरेदी केला होता. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग खडतर मानला जात होता. या भेटीनंतर अभिजित अडसूळ बंड करण्याची शक्यता आता मावळली आहे.