मुंबई : पंतप्रधान मोदींसारखा आम्ही ४०५ जागांचा पोकळ दावा करत नाही. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३५ आणि देशात इंडिया आघाडीला ३०५ जागा मिळतील असा विश्वास उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज बोलून दाखवला. भाजपवाले कोणत्याही संघर्ष लढ्यात नव्हते. त्यांचे रामावरचे प्रेम हे नकली आहे. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही, मैदानात भक्कमपणे जे लढतात राम त्यांच्या मागे उभा असतो, असा टोलाही राऊतांनी सत्ताधा-यांना लगावला.
बुधवारी खासदार संजय राऊत पत्रकारांना बोलत होते, त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या निवडणूक सर्व्हेबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कोणत्या सर्व्हेमध्ये कोणाला काय जागा दाखवतात त्यावर आम्ही सहमत नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती ४५ हून अधिक जागांचा आकडा गाठेल असे सांगत असले तरी निवडणुकीनंतर भाजपला आकडे लावायचेच काम करावे लागेल, महाविकास आघाडी राज्यात ३५ जागा जिंकेल, असे राऊत म्हणाले.