विनायक कुलकर्णी
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू झाली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे उद्या (दि .१८ ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या देखील उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एका अर्थाने शक्तिप्रदर्शन असणार आहे. महाविकास आघाडीच्या जाहीर सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सहभागी होणार आहेत.
याच कालावधीत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी देखील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान शहर आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येऊ लागला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या दि. ७ मे आणि पुणे, शिरूर, मावळ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात येत आहे.