भंडारा : मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नव्हती. पण गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता माजी मंत्री आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.
मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथील सभा आटोपल्यानंतर परिणय फुके हे लाखनी येथे परत येत होते. त्यावेळी साकोलीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात डॉ. परिणय फुके यांना दुखापत झाली नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. त्यावेळी सभा आणि गावक-यांशी चर्चा केल्यानंतर रात्री उशिरा ते लाखनी येथे परतण्यास निघाले. त्यावेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास साकोलीजवळ एक अज्ञात गाडी डॉ. फुके यांच्या गाडीसमोर आली. पण त्या अज्ञात गाडीतील चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने ही धडक टळली.
परंतु, डॉ. परिणय फुके यांच्या ताफ्यातील एक गाडी महामार्गावरील दुभाजकावर आदळली. यामध्ये गाडीतील सुरक्षारक्षक आणि इतर सहका-यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात गाडी नंतर निघून गेली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. मात्र हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. नाना पटोले हे भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ आले होते. त्यावेळी या ठिकाणी मागून येणा-या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.