बारामती : सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असली तरी अजित पवार मला मतदान करतील. कदाचित माझा मराठीतील कार्यअहवाल अजित पवारांनी वाचला नसावा. आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देते.
यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर ते मेरीटवर मलाच मतदान करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
विद्यमान खासदारांनी बारामतीमध्ये विकासनिधी आणला नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी हा दावा केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांचे मन:पूर्वक आभार मानते. ते एक गोष्ट कबूल करतात. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता. ते खरे बोलले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
वैयक्तिक नाही, वैचारिक लढाई
माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यामुळे समोर कोण लढत आहे, याचा फारसा विचार करतच नाही. कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. माझ्यावर हे संस्कारच नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा थेट सामना पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.