बारामती : कारण नसताना लोकसभेची निवडणूक भावनिक केली जात आहे. घराघरांत जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहेत. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ही निवडणूक गावकी-भावकीची नाही.हलक्या कानाने मतदान करू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यात आली त्यावेळी पवार बोलत होते.
गुरुवारी (दि. १८) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. यासाठी महायुतीचे सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, मेधाताई कुलकर्णी तसेच पुणे जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुस-या टप्प्यात असल्याने तेथे १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) आहे. उर्वरित पुणे, मावळ व शिरूर या तीन मतदारसंघांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल असून, अर्जांची छाननी दुस-या दिवशी अर्थात २६ एप्रिलला होणार आहे. अर्ज माघारीची तारीख २९ एप्रिल आहे.