सांगली : महाविकास आघाडीला राज्यभर चांगले वातावरण आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. दरम्यान, सांगलीचा तिढा देखील आम्ही लवकर सोडवू. तसेच विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू असे वक्तव्य थोरात यांनी केले आहे. त्यामुळे विशाल पाटील आता माघार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत सांगलीची जागा ही ठाकरे गटाला देण्यात आली आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावरून सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. कारण सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, जागा ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुे वादंग निर्माण झाले आहे.
विशाल पाटील लढण्यावर ठाम
दरम्यान, सांगली लोकसभेची जागा लढण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा पवित्रा विशाल पाटलांनी घेतला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. काँग्रेस आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही जागा ठाकरे गटाला सुटलेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे.