पुणे : अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज गुरुवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार आदी यावेळी उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. १९) असून अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, आमदार राहुल कुल, भगवान तापकीर, माजी आमदार विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी तसेच सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ व जय पवार यावेळी उपस्थित होते.
सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवन परिसरात पोहोचला. त्यांच्यासोबत फडणवीस व पवार हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी सुरुवातीला माजी आमदार विजय शिवतारे यांच्यासोबत डमी अर्ज दाखल केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी होऊनही सुनेत्रा पवार अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी हजर न झाल्याने अजित पवार यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे अजित पवार हे तातडीने बाहेर येऊन गाडी काढण्यास त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे देखील घाईघाईने बाहेर आले. सुनेत्रा पवार यांना गर्दीमुळे विधान भवन परिसरात येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे अजित पवार यांनी स्वत: त्यांच्या गाडीपर्यंत जाऊन त्यांना सोबत गाडीत घेऊन आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.