पुणे : कोचिंग सेंटरमध्ये नीट आणि जेईई शिकवणी घेणा-या ५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी रात्री उशीरा घडली. या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खेडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली.
कोचिंग सेंटरमध्ये शिकवणी घेणा-या विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तब्बल ५०विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांना जेवमातून विषबाधा झाल्याचे निदान झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विषबाधा झालेल्या कोचिंग सेंटरमध्ये नीट आणि जेईई परिक्षेची शिकवणी घेण्यात येते.
या शिकवणी सेंटरमध्ये तब्बल ५०० विद्यार्थी शिकवणीसाठी येतात. यातील ५० विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे. याबाबत बोलताना खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे म्हणाले की, या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान झाले.
या विद्यार्थ्यांना आता रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं पोलिसांनी पंचनामा करुन अन्नाचे नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. विद्यार्थ्यांना विषबाधा कशामुळे झाली, याचे कारण पोलिस शोधत आहेत.